Poor quality concrete road work on Medha Kalbadevi Temple road in Malvan exposed within months; chairman Sahadev Bapardekar orders notice to contractor and corrective action.
मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरातील मेढा काळबादेवी मंदिर मार्गांवर करण्यात आलेले रस्ता काँक्रिटिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाल्यानंतर नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेविका मेघा सावंत तसेच पालिका अभियंता राजा केरीपाळे उपस्थित होते.
निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या या काँक्रिट रस्त्याचे अवघ्या काही महिन्यांत ठिकठिकाणी काँक्रिट उखडले असून, वाहनांच्या ये-जा होताच सिमेंट-माती उडून संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या निकृष्ट कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
लाखो रुपये खर्च करून केलेली कामे जर निकृष्ट दर्जाची ठरत असतील तर अशा कामांचा उपयोग काय? काम सुरू असताना प्रशासनाने त्यावर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. निकृष्ट कामांमुळे जनतेला सुविधा कशा मिळणार? अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी संबंधित ठेकेदाराला तात्काळ नोटीस बजावून सदर रस्ता पुन्हा दर्जेदार पद्धतीने काँक्रिटिकरण करून पूर्ण करण्याचे आदेश बांधकाम प्रशासनास दिले.
शहरातील सर्व विकासकामांची सखोल पाहणी केली जाणार असून, दर्जाहीन कामे आढळल्यास संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे बापर्डेकर यांनी स्पष्ट केले. जनतेच्या पैशातून जनतेसाठी होणारी कामे दर्जेदारच असली पाहिजेत, ही आमची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यासंदर्भात प्रशासनाला तात्काळ पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.







