मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेत स्थायी समिती गठीत करण्यात आली असून बांधकाम, स्वच्छता व आरोग्य, पाणीपुरवठा तसेच महिला व बालकल्याण समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड बुधवारी झालेल्या सभेत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली.
नगराध्यक्षा ममता वराडकर या पदसिद्ध स्थायी समितीच्या अध्यक्ष असणार आहेत. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांची पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी (पदसिद्ध) निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी नगरसेवक सहदेव बापार्डेकर, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी नगरसेविका पूनम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नगरसेविका अन्वेषा आचरेकर तर उपसभापतीपदी नगरसेविका अश्विनी कांदळकर यांची निवड करण्यात आली.
या नव्याने गठीत झालेल्या समित्यांमुळे मालवण शहरातील विकासकामे, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा व महिला-बालकल्याण विषयक उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







