मुंबई : माध्यम क्षेत्रातील प्रतिभावंतांसाठी प्रतिष्ठेचा ठरत असलेल्या **‘मुक्तपीठ सन्मान’**मध्ये यंदा कोकणच्या मातीतून घडलेल्या अनुभवी पत्रकाराचा गौरव करण्यात आला. टीव्ही 9 न्यूज चॅनलचे रिपोर्टर विकास गावकर यांना यंदाचा ‘सर्वोत्तम रिपोर्टर’ सन्मान जाहीर झाला आहे.
माध्यम क्षेत्रातील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंतांना व्यासपीठ देणारा ‘मुक्तपीठ सन्मान’ हा आपल्या प्रकारातील आगळा उपक्रम मानला जातो. रिपोर्टरपासून एडिटरपर्यंत, अँकरपासून डेस्कवरील क्रिएटिव्ह गुणवंतांपर्यंत, तसेच टेक्निकल विभागातील प्रतिभावंतांचाही या सन्मानातून गौरव केला जातो. या पुरस्काराची सुरुवात २०२५ मध्ये झाली. दुसऱ्या वर्षीच्या मुक्तपीठ सन्मानमूर्तींच्या यादीत २० प्रतिभावंतांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गणपती उत्सवाची लगबग सुरू असताना कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींना व्यापक व्यासपीठावर नेण्यात विकास गावकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कोकणातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि उत्सवांच्या विविध रंगांचे बारकावे ते आपल्या रिपोर्टिंगमधून प्रभावीपणे मांडतात.
कोकणच्या मातीतला पत्रकार आणि कोकणच्या नाडीची अचूक जाण असलेला रिपोर्टर अशी ओळख निर्माण केलेल्या विकास गावकर यांच्या अनुभवाला आणि सातत्यपूर्ण पत्रकारितेला ‘सर्वोत्तम रिपोर्टर’ या सन्मानाने मिळालेली दाद महत्त्वाची मानली जात आहे.
सध्या विकास गावकर टीव्ही 9 न्यूज चॅनलमध्ये कार्यरत असून, त्यांच्या या गौरवाबद्दल माध्यम क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






