सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भाजप व महायुतीने विरोधकांना नामोहरम करत बिनविरोध विजयाचा धडाका उडवला आहे. जिल्हा परिषदेत तब्बल पाच जागांवर, तर पंचायत समित्यांत चार जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व निर्विवादपणे अधोरेखित झाले आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये
खारेपाटणमधून प्राची इस्वलकर (भाजप), बांद्यातून प्रमोद कामत (भाजप), जानवलीतून रुहिता राजेश तांबे (भाजप कार्यकर्ती, शिवसेना उमेदवार), पडेलमधून सुयोगी रविंद्र घाडी (भाजप), तर बापर्डेतून अवनी अमोल तेली (भाजप)
यांची बिनविरोध निवड झाली आहे.
याचबरोबर कणकवली पंचायत समितीतील वरवडे मतदारसंघातून सोनू सावंत (भाजप) यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
देवगड तालुक्यातील पंचायत समितीतही भाजपचा डंका वाजला असून पडेलमधून अंकुश यशवंत ठूकरूल, नाडणमधून गणेश सदाशिव राणे, तर बापर्डेमधून संजना संजय लाड हे तिघेही भाजपकडून बिनविरोध निवडून आले आहेत.
सलग होत असलेल्या या बिनविरोध निवडींमुळे विरोधी पक्षांचे उमेदवार माघारीवर माघारी घेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप- महायुतीची पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात भाजपच्या संघटनशक्तीपुढे विरोधक सपशेल अपयशी ठरत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपचे वर्चस्व अधिक ठळक होण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गच्या राजकारणात सध्या “भाजपच अजिंक्य” असा स्पष्ट संदेश या निकालांतून गेला आहे.






