नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे अधिकृत नाव आणि पारंपरिक निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ याबाबत सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात बुधवार, २१ जानेवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर आता निर्णायक टप्पा गाठला जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार असून, सलग दोन दिवस दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. न्यायालयाने या प्रकरणासाठी विशेष वेळ राखून ठेवला असून, दोन्ही पक्षांना आपली भूमिका सविस्तर मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
२०२२ मध्ये शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे अधिकृत नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह बहाल केले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता असून, राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.






