मालवण | प्रतिनिधी :
मालवण येथील माघी गणेश मंदिरात सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंदिराचा दहावा वर्धापन दिन तसेच वार्षिक माघी गणेश जयंती उत्सव दिनांक २१ ते २६ जानेवारी या कालावधीत मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या प्रारंभी बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता उदक शांती व तीर्थप्रसाद होणार असून सायंकाळी ५ वाजता मालवण बाजारपेठ मार्गे श्रींचे भव्य आगमन होईल. रात्री ९ वाजता सातेरी भजन मंडळ, कांदळगाव (बुवा – राजन कोदे) यांचे भजन आयोजित करण्यात आले आहे.
गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गणेशमूर्ती पूजा, सकाळी ११ वाजता अथर्वशीर्ष पठण तर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सहस्र मोदकांचा महाआरतीसह नैवेद्य अर्पण केला जाणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता श्रींची आरती होईल. रात्री ८ वाजता बलभीम भजन मंडळ, सर्जेकोट (बुवा – रोहित आडकर) यांचे भजन व रात्री ९.३० वाजता रेकॉर्ड डान्स होणार आहे.
शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० वाजता श्रींची आरती, रात्री ८ वाजता श्री भूतनाथ भजन मंडळ, वायरी (बुवा – भालचंद्र केळुसकर) यांचे भजन तसेच रात्री ९.३० वाजता रेकॉर्ड डान्स होईल.
शनिवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता श्री समर्थ समईनृत्य (खुडी, जुवीवाडी, देवगड) सादर होणार असून सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती होईल. रात्री ८.३० वाजता वेताळ प्रासादिक भजन मंडळ, पोईप (बुवा – ओमकार येरम) यांचे भजन तसेच रात्री ९.३० वाजता दोन अंकी विनोदी नाटक ‘सध्या ह्या शिक्षणाची गरज हा…’ सादर करण्यात येणार आहे.
रविवार, दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७.३० वाजता श्रींची आरती, रात्री ८.३० वाजता घुमडाई भजन मंडळ, घुमडे (बुवा – नाना सामंत) यांचे भजन तसेच रात्री ९.३० वाजता विनोदी नाटक ‘लग्नाची वरात – कोणाच्या घरात’ सादर होणार आहे.
उत्सवाची सांगता सोमवार, दिनांक २६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाने होणार असून सायंकाळी ५ वाजता श्रींची सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.





