मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली देवस्थान नूतनीकरणाचा २६ वा वर्धापन दिन सोहळा तसेच माघी गणेशोत्सवानिमित्त दिनांक २२ ते २६ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता रेवंडी, सर्जेकोट, कोळंब, हडी व कांदळगाव पंचक्रोशीतील कलाकारांसाठी दोन गटांमध्ये नृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत छोटा गट ५ ते १५ वर्षांखालील तर मोठा गट १५ वर्षांवरील असणार आहे. प्रथम येणाऱ्या दहा स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार असून अधिक माहितीसाठी ९४२२४४७०२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवार, दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद होणार असून रात्री १० वाजता अमृतनाथ दशावतार मंडळ, म्हापण यांचा ‘कुर्मादासाची वारी’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वाजता मोफत रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, दुपारी २ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होणार आहे. सायंकाळी ४ वाजता कलावती आई भजन मंडळ, सर्जेकोट यांचे भजन होईल. रात्री १० वाजता राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकप्राप्त नाटक ‘वाट चुकलो देव’ सादर होणार आहे.
शनिवार, दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, तर रात्री १० वाजता रामेश्वर प्रॉडक्शन, मुंबई निर्मित दोन अंकी संगीत नाटक ‘दुरितांचे तिमीर जावो’ सादर करण्यात येणार आहे.
उत्सवाची सांगता रविवार, दिनांक २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसादाने होणार असून सायंकाळी ४ वाजता श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भद्रकाली देवस्थान मंडळ व रेवंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.






