
मालवण : प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची तसेच दोन स्वीकृत नगरसेवक पदांची निवड आज नगरपालिकेत पार पडली. नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी श्री. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिंदे शिवसेनेचे नगरसेवक दीपक पाटकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे या निवडीत भाजपच्या नगरसेवकांनीही त्यांना पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून आले.
उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख व दोन टर्म नगरसेवक राहिलेले दीपक पाटकर यांनी मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने दीपक पाटकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी अधिकृतरीत्या जाहीर केले.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिंदे शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तर भाजपतर्फे भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष सौ. वराडकर यांनी दोन्ही स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले.
या निवडीसाठी आयोजित नगरपालिकेच्या विशेष सभेत नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी कामकाज चालवत निवड प्रक्रिया पूर्ण केली. या वेळी शिंदे शिवसेना व भाजपचे नगरसेवक एकत्र आल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.
निवड जाहीर होताच शिंदे शिवसेना, भाजप व उबाठा शिवसेना पक्षाचे नगरसेवक तसेच अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना गटनेत्या पूनम चव्हाण, नगरसेविका मेघा गावकर, निना मुंबरकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, भाजप गटनेत्या अन्वेषा आचरेकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, सुदेश आचरेकर, ठाकरे गटाचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर तसेच उमेश नेरुरकर, स्वप्नाली नेरुरकर, ज्योती तोरसकर, जगदीश गावकर, जॉन नरोना, राजा गावकर, परशुराम पाटकर, सन्मेष परब, मोहन वराडकर, शेखर गाड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या निवडीमुळे मालवण नगरपालिकेतील सत्तासमीकरणे अधिक स्पष्ट झाली असून, शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय समन्वयातून काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे






