कणकवली : प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्यावतीने नगरसेवक सुशांत नाईक यांचे नाव अधिकृतपणे निश्चित करण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीचे गटनेते राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर यांनी आघाडीतील सर्व नगरसेवकांना व्हिप बजावला असून, अधिकृत उमेदवार सुशांत श्रीधर नाईक यांनाच मतदान करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड येत्या १३ जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने शहर विकास आघाडीचे गटनेते रुपेश नार्वेकर यांनी सर्व नगरसेवकांना १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत भालचंद्र महाराज सभागृहात होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेस न चुकता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उपनगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सुशांत नाईक यांनाच मतदान करावे, असा स्पष्ट पक्षादेश लेखी स्वरूपात देण्यात आला आहे.
या व्हिपमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम ३ अन्वये पक्षादेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित नगरसेवकावर अनर्हतेची कारवाई होऊ शकते. नगराध्यक्ष संदेश पारकर, जयेश धुमाळे, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, संकेत नाईक, लुकेश कांबळे, वैष्णवी सरमळकर (दीपिका जाधव) आदी नगरसेवकांना हा व्हिप बजावण्यात आला आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे ९ नगरसेवक असून संख्याबळाच्या दृष्टीने बहुमत भाजपकडे आहे. मात्र शहर विकास आघाडीकडे नगराध्यक्षांसह ८ नगरसेवक असल्याने उपनगराध्यक्ष निवडीत समसमान मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आघाडीतील कोणताही नगरसेवक गैरहजर राहू नये किंवा विरोधात मतदान करू नये, या दृष्टीने गटनेत्यांकडून खबरदारी म्हणून व्हिप बजावण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना कुटुंबियांसह अज्ञात स्थळी हलविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उपनगराध्यक्ष निवडीत कोणताही धोका, दगाफटका किंवा अनपेक्षित घडामोड होऊ नये, यासाठी शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वतोपरी खबरदारी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.





