मालवण | प्रतिनिधी :
मालवण शहरातील वायरी ते तारकर्लीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रांगोळी महाराज मठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडलेला मोठा व धोकादायक खड्डा अखेर बुजवण्यात आला आहे. या खड्ड्यामुळे वाहनचालकांसह दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन नगरसेविका पूनम चव्हाण यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या सहकार्याने श्रमदानातून हा खड्डा बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला.
तारकर्ली हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मठासमोरील खड्ड्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढली होती. प्रशासकीय कार्यवाही होण्याची प्रतीक्षा न करता जनहिताच्या दृष्टीने नगरसेविका पूनम चव्हाण यांनी तात्काळ स्थानिक रहिवासी व तरुणांना सोबत घेत समस्या सोडवली.
या उपक्रमासाठी अमित सावंत, उमेश जाधव, नागेश चव्हाण, अभिजित, तुषार लुडबे आणि अपर्णा सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. लोकसहभागातून केलेल्या या तत्पर आणि सामाजिक कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी नगरसेविका पूनम चव्हाण यांच्या कार्यतत्परतेचे अभिनंदन केले आहे.






