मालवण प्रतिनिधी | मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत कोकण झोन संघाने प्रथमच तृतीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृ. सी. देसाई शिक्षणमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या चार झोनमधील संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा विरार महाविद्यालय, विरार (मुंबई) येथे उत्साहात पार पडली. निर्णायक सामन्यात कोकण झोन संघाने ठाणे संघावर मात करत ब्राँझ मेडल आपल्या नावावर केले. या ऐतिहासिक यशात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या तब्बल १० विद्यार्थिनींचा समावेश असल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. राबते, जिमखाना प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, क्रिकेट कोच श्री. संदीप पेडणेकर व श्री. ज्ञानेश केळुसकर, डॉ. उज्ज्वला सामंत, डॉ. डी. व्ही. हारगिले, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. हसन खान, प्रा. पी. बी. खरात, प्रा. रोहिणी फाटक, प्रा. रामचंद्र तावडे, प्रा. संग्राम सिंह पवार, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघाला लाभलेल्या उत्कृष्ट कोचिंगमुळे खेळाडूंनी संघभावना, शिस्त व जिद्दीचे दर्शन घडवत हे यश मिळवले, असे यावेळी सांगण्यात आले. या कामगिरीमुळे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे नाव मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा इतिहासात कोरले गेले आहे.
या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण, सचिव श्री. चंद्रशेखर कुशे, ॲड. श्री. समीर गवाणकर, जिमखाना विभाग, प्राचार्य, सर्व प्राध्यापकवर्ग, नॉन-टीचिंग स्टाफ, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांनी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या पुढील क्रीडावाटचालीस शुभेच्छा दिल्या.





