मालवण (प्रतिनिधी) : पत्रकार हे केवळ बातम्या देणारे नाहीत, तर समाजाची संस्कृती जपणारे आणि कला-संवेदनशील मनाचे लोक असतात, याचा प्रत्यय मालवण तालुका पत्रकार समितीने आयोजित केलेल्या गणेश सजावट स्पर्धेतून आला. त्यामुळे पत्रकार बांधवांसाठी घेण्यात आलेली ही गणेश सजावट स्पर्धा अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मसुरे-चांदेर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी केले.
मालवण तालुका पत्रकार समितीतर्फे पत्रकार सदस्यांसाठी आयोजित गणेश सजावट स्पर्धा २०२५ मधील विजेत्या पत्रकारांचा मसुरे येथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नितीन गावडे, द्वितीय क्रमांक भूषण मेतर, तृतीय क्रमांक प्रफुल्ल देसाई यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच उत्तेजनार्थ प्रथम केशव भोगले, उत्तेजनार्थ द्वितीय मनोज चव्हाण आणि उत्तेजनार्थ तृतीय अर्जुन बापर्डेकर यांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब, माजी जि. प. अध्यक्ष सौ. सरोज परब, मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे, छोटू ठाकूर, मुख्याध्यापिका अर्चना कोदे, प्रफुल्ल देसाई, राजन परब, साहित्यिका वैशाली पंडित, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, गुरुनाथ तिरपणकर, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमातून पत्रकारांच्या कलात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवांचे दर्शन घडले असून, अशा उपक्रमांमुळे पत्रकारांमधील सकारात्मक ऊर्जा आणि एकोपा अधिक बळकट होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





