
बांदा / पत्रादेवी :
कोकणच्या राजकारणातील अढळ नेतृत्व, जनतेच्या मनात घर केलेले व्यक्तिमत्त्व, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार खा. नारायणराव राणे यांच्या स्वागतासाठी आज गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या पत्रादेवी चेकपोस्टवर अभूतपूर्व जनसागर उसळला. हा स्वागतसोहळा म्हणजे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक अविस्मरणीय पर्व ठरला.

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खा. नारायणराव राणे यांचे भव्य, जल्लोषी आणि भावनिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन करत स्वागत केले.

ढोल-ताशांचा निनाद, घोषणांचा गजर
ढोल-ताशांच्या कडकडाटात खा. राणेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. “राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “हमारा नेता कैसा हो? नारायण राणे जैसा हो!”, “कोण आला रे कोण आला? कोकणचा वाघ आला!”, “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव” अशा बुलंद घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला.यावेळी पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या समर्थनार्थही जोरदार घोषणांनी वातावरण तापले होते.

इतिहास पुन्हा जिवंत झाला…
खा. नारायणराव राणे मुख्यमंत्री असताना मुंबईहून कोकणात प्रवेश करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण ते बांदा या संपूर्ण पट्ट्यात जसा जनउत्साह उसळला होता, तोच उत्साह, तोच दिमाख आणि तोच भावनिक ओघ आज पत्रादेवी येथे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

या क्षणी अनेक जुने-जाणते राणे समर्थक कार्यकर्ते भावूक झाले. आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. कित्येक वर्षांनी भेटलेले जुने सहकारी एकमेकांना मिठी मारत, आठवणींना वाट मोकळी करून देताना दिसत होते.

४–५ किमी वाहनांच्या रांगा, महिला कार्यकर्त्यांचीही लक्षणीय उपस्थिती
पत्रादेवी चेकपोस्टपासून बांदा शहरापर्यंत ४ ते ५ किलोमीटरपर्यंत महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पुरुषांसोबतच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थितीही लक्षणीय ठरली. शिवसेना व भाजपमध्ये आज कार्यरत असलेले अनेक जुने सहकारी पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही इतर पक्षांतील जुने राणे समर्थक यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

‘दादा’ पाहण्यासाठी झुंबड, प्रेम पाहून खा. राणे गहिवरले
खा. नारायणराव राणे यांच्या आगमनावेळी त्यांच्या वाहनावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. आपल्या लाडक्या नेत्याला एक झलक पाहण्यासाठी, हस्तांदोलनासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरशः गाडीभोवती गराडा घातला.पुष्पगुच्छ स्वीकारताना कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून खा. राणे स्वतःही गहिवरून गेले. यावेळी त्यांच्या समवेत सौ. निलमताई राणे उपस्थित होत्या.

विशेष व्हॅनिटी व्हॅनमधून कणकवलीकडे प्रस्थान
पत्रादेवी येथून खा. नारायणराव राणे, ना. नितेश राणे, आ. निलेश राणे व प्रमुख पदाधिकारी विशेष व्हॅनिटी व्हॅनमधून कणकवलीच्या दिशेने रवाना झाले. “दादा… दादा…” अशी हाक देत कार्यकर्ते आपल्या नेत्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. गर्दीची पर्वा न करता आपल्या ‘दैवतासमान’ नेत्याच्या दर्शनासाठी सुरू असलेली धडपड अलौकिक आणि अवर्णनीय होती.

चोख पोलिस बंदोबस्त
या भव्य स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी, शेकडो पोलिस कर्मचारी व वाहतूक पोलिसांची मोठ्या प्रमाणात तैनाती करण्यात आली होती. हजारो कार्यकर्ते व शेकडो वाहनांची गर्दी पाहता पोलिसांनाही गर्दी नियंत्रणासाठी मोठी कसरत करावी लागली.

एकंदरीत, कोकणच्या राजकारणातील ताकद, जनाधार आणि भावनिक नात्याचे दर्शन घडवणारा हा स्वागतसोहळा जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार ठरला.






