मालवण, दि. प्रतिनिधी – मालवण शहरातील आडारी सातेरी मांड परिसरात एका कोंबडी पालनाच्या शेडमधून ३० गावठी कोंबड्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंद्रकांत पांडुरंग जैतापकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडारी सातेरी मांड येथे राहणारे चंद्रकांत जैतापकर यांच्या घराशेजारी कोंबडी पालनाची शेड आहे. दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या शेडमध्ये प्रवेश केला. चोरी करताना चोरट्याने शेडमधील विजेची वायर कापून आत ठेवलेल्या एकूण ३० गावठी कोंबड्या लंपास केल्या.
प्रत्येक कोंबडीची किंमत अंदाजे १६० रुपये धरली असून या चोरीमुळे सुमारे ४,८०० रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) व ३२४(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मालवण पोलीस करीत आहेत.





