सावंतवाडी : नगरपालिका निवडणुकांचा धुरळा खाली बसल्यानंतर आता सावंतवाडीच्या राजकारणात खरी रंगत उपनगराध्यक्ष पदावरून सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पद भाजपकडे गेले असले तरी उपनगराध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपमध्ये अंतर्गत चढाओढ सुरू असताना, दुसरीकडे शिवसेनेनेही आपली रणनीती स्पष्टपणे मांडत ‘संधी मिळाली नाही, तर विरोधात बसण्याची तयारी’ दाखवली आहे.
सावंतवाडी नगरपालिकेत झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उतरले होते. निकालानंतर भाजपला ११ तर शिवसेनेला ७ जागा मिळाल्या. संख्याबळाच्या जोरावर भाजपच्या श्रद्धा भोसले यांना नगराध्यक्षपद मिळाले. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ‘महायुती’ची चर्चा सुरू झाल्याने उपनगराध्यक्षपदाचा तिढा निर्माण झाला आहे.
भाजपकडून उपनगराध्यक्षपदासाठी सध्या ॲड. अनिल निरवडेकर यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे आणि कट्टर समर्थक म्हणून निरवडेकरांची ओळख आहे. त्यामुळे पक्षांतर्गत पातळीवर त्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, भाजपचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांचेही नाव चर्चेत असून, नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे त्यांनाही संधी मिळू शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.
या सगळ्या समीकरणांमध्ये शिवसेनेने आपला डाव मांडला आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षांचा प्रशासकीय अनुभव, नगरपालिकेच्या कामकाजावर असलेली पकड आणि स्थानिक पातळीवरील स्वीकारार्हता लक्षात घेता महायुतीच्या चौकटीत संजू परब यांना संधी द्यावी, असा प्रस्ताव शिवसेनेकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र, हा प्रस्ताव नाकारला गेला तर शिवसेना सत्तेत सहभागी होण्याऐवजी थेट विरोधी बाकांवर बसण्यासही तयार आहे. ‘सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा’ अशी भूमिका शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून सूचकपणे मांडली जात आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाचा निर्णय हा केवळ पदापुरता मर्यादित न राहता, सावंतवाडीतील भविष्यातील राजकीय समीकरणे ठरवणारा ठरू शकतो.
सध्या तरी सावंतवाडीच्या राजकारणात अनिल निरवडेकर आणि संजू परब या दोन मित्रांमधील मैत्रीपूर्ण पण तीव्र चढाओढ पाहायला मिळत आहे. महायुती होते की नाही, आणि झालीच तर त्यात कोणाला न्याय मिळतो, यावरच सावंतवाडीचा पुढील राजकीय पट स्पष्ट होणार आहे. येत्या काही दिवसांत या प्रश्नाचे उत्तर मिळेल, मात्र तोपर्यंत सावंतवाडीतील राजकीय खलबते थांबण्याची चिन्हे नाहीत.







