मालवण, दि. प्रतिनिधी : परंपरेचा सन्मान राखतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचलित श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथे हरितसेना उपक्रमांतर्गत राखी पौर्णिमा पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थिनींनी पान-फुले, सूक्ष्म नैसर्गिक साहित्य आणि रंगीत धाग्यांचा वापर करून आकर्षक पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. या राख्या वटवृक्षाला बांधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांना पर्यावरणपूरक राख्या बांधत पारंपरिक स्नेहबंध जोपासला.
प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी विद्यार्थ्यांना वटवृक्षाचे महत्त्व आणि वृक्षसंरक्षणाची गरज समजावून सांगितली. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी प्रशालेच्या शिक्षिका वेदिका दळवी, प्रतिभा केळूसकर, अन्वी पाटकर, तसेच MSAT विभागाचे निदेशक जगन्नाथ आंगणे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सण साजरा करण्यासोबतच निसर्गरक्षणाची जबाबदारीही अधोरेखित करण्यात आली.






