रक्षाबंधनाच्या औचित्याने मालवणात सिंधुदुर्ग पोलिसांचा अनोखा जनजागृती उपक्रम
मालवण, दि. २८ : प्रतिनिधी
मालवणच्या देऊळवाडा नाक्यावर नेहमीप्रमाणे पोलीस बंदोबस्त पाहून वाहनचालकांच्या मनात धाक निर्माण झाला होता. काही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांनी अडवत रस्त्याच्या कडेला घेतले. ‘हेल्मेट कुठे आहे?’ असा सवाल होताच दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. आता कारवाई होणार, या भीतीने ते काहीसे धास्तावले. मात्र पोलिसांनी चक्क हात पुढे करण्यास सांगितले आणि महिला पोलिसांनी त्यांच्या हातावर ‘सुरक्षा राखी’ बांधत गुलाबाचे फूल दिले.
‘यापुढे हेल्मेट घालूनच सुरक्षित प्रवास करा; अन्यथा पुढील काळात नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ असा आपुलकीचा आणि काळजीचा सल्ला पोलिसांनी दिला. पोलिसांच्या या अनोख्या कृतीने वाहनचालकांनाही दिलासा मिळाला आणि यापुढे हेल्मेट घालूनच दुचाकी चालविण्याचे वचन त्यांनी पोलिसांना दिले.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने ‘सुरक्षा राखी’ हा नाविन्यपूर्ण आणि प्रबोधनात्मक उपक्रम मालवण शहरात राबविण्यात आला. रस्ते सुरक्षेचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
मालवण शहरातील देऊळवाडा नाक्यावर आयोजित या जनजागृती अभियानात हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांसह लोकप्रतिनिधींनी ‘सुरक्षा राखी’ बांधली. हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देत सुरक्षित प्रवासाचा संदेश देण्यात आला. दुचाकी चालविणाऱ्या महिलांना गुलाबपुष्प देऊन हेल्मेट वापराबाबत आपुलकीने जनजागृती करण्यात आली.
जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित या उपक्रमात नगरसेविका नीना मुंबरकर यांनीही सहभाग घेत वाहनचालकांना सुरक्षा राखी बांधली. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेल्मेट, सीटबेल्ट नसेल तर कारवाई
या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने जनजागृतीसोबतच नियमभंग करणाऱ्यांना स्पष्ट इशाराही दिला आहे. शहरात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट, तर चारचाकी वाहनचालकांसाठी सीटबेल्टचा वापर बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
या जनजागृती मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक पंडीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, जितेंद्र पेडणेकर, सुरज रेडकर, सुप्रिया पवार, रंजू डोये, संकेत तांडेल, राजाराम तेरेखोलकर, शशिशेखर प्रभू, आरती खोबरेकर, सोनाली पाटकर, भक्ती शिवलकर, ज्योस्त्ना पोखरे, दीपक गावडे, धनंजय निवतकर, गणेश माने तसेच जिल्हा वाहतूक पोलीस कर्मचारी महेंद्र देऊलकर, मंचकराव शिरडे आणि नागेश मालवे आदी अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे नगरसेविका नीना मुंबरकर यांनी कौतुक केले. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच आपुलकीने जनजागृती करून रस्ते सुरक्षा वाढविण्याचा पोलिसांचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला.







