बंदर जेटीवर रंगणार पारंपरिक स्पर्धा; १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन
मालवण, दि. प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणात महिलांसाठी खुल्या ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे होणार आहे. मालवण शहर तसेच तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या मालवण शहर संघटक राधिका मोंडकर यांनी केले.
या स्पर्धेची माहिती देण्यासाठी मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना राधिका मोंडकर यांनी महिलांनी पारंपरिक नारळ लढविणे स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
आकर्षक पारितोषिकांची मेजवानी
महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या खुल्या स्पर्धेसाठी आयोजकांच्या वतीने आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
मालवणच्या सांस्कृतिक परंपरेतील नारळ लढविणे या पारंपरिक खेळाला महिलांच्या सहभागातून व्यासपीठ मिळावे आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ वर्षांखालील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महिला तसेच बालकांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेतील सहभागासाठी पूजा करलकर – ७७४४९७२१११, निनाक्षी शिंदे – ९३२५९४२७९८ आणि गौरी सावंत – ७५८८७७४४३६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला सोनाली डिचवलकर, पूजा करलकर, गौरी सावंत, अनिता गिरकर, माधुरी प्रभू, स्मिता सरमळकर, माधुरी जावकर, वैदेही सरमळकर, नीनाक्षी शिंदे, योगिता गावकर, वृंदा गवंडे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
मालवण शहर आणि तालुक्यातील महिलांनी तसेच पालकांनी आपल्या मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.







