मालवण (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव-२०२६’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय देशभक्तीपर कला महोत्सवात ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेने उल्लेखनीय यश संपादन केले. देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात ओझर विद्यामंदिरने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे मांडला.
ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सुरेल गायन, प्रभावी समूहसादरीकरण आणि जोशपूर्ण देशभक्तीच्या भावनेतून उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळविला. या समूहगीतासाठी मंगेश कदम आणि श्रीकांत मालवणकर यांनी संगीत साथ दिली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरी कदम, तसेच प्रभारी मुख्याध्यापक, प्रशालेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या यशामुळे ओझर विद्यामंदिरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि देशभक्तीच्या भावनेला मिळालेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.







