मालवण (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा व संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ अंतर्गत तृतीय पुष्प हिवाळे येथील समाज मंदिरात उत्साहात संपन्न झाले. ‘बौद्धांची आचारसंहिता’ या विषयावर तालुका संरक्षण उपाध्यक्ष, केंद्रीय शिक्षक व माजी श्रामणेर बौद्धाचार्य योगेश वराडकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप व धूप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण केले. हिवाळे गाव शाखेच्या वतीने उपस्थित तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
तथागत भगवान बुद्धांचा धम्म आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला धम्म यांचे अनुयायी म्हणून दैनंदिन जीवन कसे असावे, तसेच बौद्ध म्हणून कोणती आचारसंहिता पाळावी, याबाबत योगेश वराडकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. धम्मातील तत्त्वे आचरणात आणल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विलास वळंजू, नचिकेत पवार आणि प्रकाश पवार यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष रविकांत कदम, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, तालुका सरचिटणीस नचिकेत पवार, कोषाध्यक्ष प्रकाश पवार, संस्कार उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, तालुका कार्यालयीन सचिव शंकर कदम, संस्कार सचिव मिलिंद पवार, सचिन कासले, तालुका महिला संस्कार उपाध्यक्षा आम्रपाली पवार, हिवाळे गावशाखा अध्यक्ष नितीश पवार, सचिव सागर पवार, कोषाध्यक्ष दिनेश कदम, मुंबई अध्यक्ष विजय पवार, अशोक पवार, संजय पवार, वर्देकर यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्कार विभागाचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी केले. तर गाव शाखेच्या वतीने नितीश पवार यांनी आभार मानले.






