सिंधुदुर्गनगरी, दि. १४ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्हा नशामुक्त करण्याचे अभियान प्राधान्याने हाती घेऊन अमली पदार्थांविरोधात **‘झिरो टॉलरन्स’**ची भूमिका घ्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
ओरोस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालयात पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘नशामुक्त शालेय परिसर’ या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
जिल्ह्यातील १३४ शाळांनी या अभियानात सहभाग नोंदविला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्था आणि रोटरी क्लबचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले की, युवक ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांना अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अमली पदार्थांची पुरवठा साखळी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. मटका, जुगार, ड्रग्ज यांसह समाजघातक प्रवृत्तींना जिल्ह्यात थारा मिळता कामा नये. नशामुक्त जिल्हा हे प्राधान्याचे काम असून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार नारायण राणे यांनी अभियानाचे कौतुक करत पालकांनी नशामुक्तीचे महत्त्व मुलांना समजावून सांगावे, असे आवाहन केले. मोबाईलपासूनही अनेक व्यसनांची सुरुवात होऊ शकते. विद्यार्थ्यांनी जीवनाचे उद्दिष्ट निश्चित करून नशेपासून दूर राहावे आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करून त्यांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज व्यक्त केली. तरुणांची ऊर्जा सकारात्मक आणि विधायक कार्यासाठी वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी प्रास्ताविकात व्यसनाधीनता ही नकळत कुटुंब उद्ध्वस्त करणारी समस्या असल्याचे सांगितले. मागील वर्षी नशामुक्ती अभियानांतर्गत सुमारे ५० कार्यक्रमांमध्ये १४ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदा शाळांमधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यात ‘पोलीस दूत’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जनजागृतीपर ‘ड्रगला नाही म्हणू’ या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर ‘पोलीस दूत’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी आभार मानले.







