Smrutilila Awards ceremony held in Malvan honors veteran and young sportspersons, with former Indian cricketer Pandurang Salgaonkar emphasizing discipline and dedication in sports.
मालवण (प्रतिनिधी)
खेळ हा केवळ जिंकण्यासाठी नसतो, तर तो व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी असतो. आजच्या युवा, तरुण खेळाडूंनी मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचा अंगीकार केला तर यश नक्कीच मिळेल. ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी दिलेले अनुभव आणि मार्गदर्शन हे नव्या पिढीसाठी अमूल्य भांडार आहे, युवा व ज्येष्ठ खेळाडूंनी एकत्रितपणे क्रीडा संस्कृती जोपासावी, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघांचे माजी वेगवान गोलंदाज व देवबागचे सुपुत्र पांडुरंग साळगावकर यांनी येथे बोलताना केले.
मालवणचे माजी नगराध्यक्ष व खेळाडू स्व. लीलाधर गणेश हडकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या स्मृतीलीला पुरस्कारांचा वितरण समारंभ संपन्न झाला. मालवण स्पोर्ट असोसिएशन, भंडारी समाज व हडकर कुटुंबीय यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता मनमोहन वराडकर, भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, भारतीय क्रिकेट संघांचे माजी वेगवान गोलंदाज पांडुरंग साळगावकर, मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, मालवण स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामा शेटे, उद्योजक जॉन नरोना, सकल भंडारीत हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, निवेदक अजय शिंदे, ज्येष्ठ क्रिकेटपटू देवदत्त हडकर आदी उपस्थित होते.
यावेळी भारतीय संघातील माजी वेगवान गोलंदाज पांडुरंग साळगावकर यांना देवदत्त हडकर व सर्व हडकर कुटुंबीयांनी स्मृतिलीला पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. यावेळी लीलाधर हडकर यांच्या समकालीन क्रिकेटपटू सत्यजित जयराम चिंदरकर, उत्तम भिवा नेमळेकर त्याचप्रमाणे हॉलीबॉलपटू से मीनिंग मनवेल फर्नांडिस यांनाही स्मृतीलीला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याचवेळी उदयोन्मुख हॉलीबॉल खेळाडू वेद श्यामसुंदर वारंग, बास्केटबॉल खेळाडू वरद विजयकुमार मिटके व लौकीक हेमंत तळवडेकर, राज्य पातळीवरील टेबल टेनिसची खेळाडू प्राची श्रीराम गावकर या युवा खेळाडूंचा स्मृतीलीला पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आंतर महाविद्यालयीन तसेच राष्ट्रीय स्तरावरील लेदरबॉल महिला क्रिकेट स्पर्धेत यश मिळविणाऱ्या गार्गी जुवेकर, सानिका मेस्त्री, अनुष्का आंबेरकर, ईशा दुखंडे, निकिता शिरोडकर, धनश्री मेस्त्री, दुर्गा जाधव, आकांक्षा धामापूरकर , सिमरन कांदळगावकर, लिशा कडू या खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले. या खेळाडूंना विनर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक संदिप पेडणेकर, ज्ञानेश केळुसकर, सुशील शेडगे यांचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या क्रिकेट टीमचाही सत्कार मालवण स्पोर्ट असोसिएशनचे रामा शेट्टी, नंदू देसाई, पप्पू परब, निळकंठ मालवणकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, भाई गोवेकर, महेश गावकर व जॉन नरोना यांनी विचार मांडत उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना पांडुरंग साळगावकरांचा आदर्श समोर ठेवून सराव करावा व आपल्या मालवणचे नाव उज्वल करावे, असे सांगितले. यावेळी हडकर कुटुंबीय त्याचबरोबर सकल भंडारीचे अजित गवंडे, भाऊ साळगावकर, मिलिंद झाड, राजू आंबेरकर, निलेश शिरोडकर, प्रदीप वेंगुर्लेकर, बाळा मयेकर, बाळू मुंदगेकर, राजा शंकरदास, उल्हास सरमळकर, अरविंद मयेकर, जितू वाळके, जयमाला मयेकर आदी क्रीडाप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले तर आभार पंकज पेडणेकर यांनी मानले.







