
मालवण – प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तिरवडे गावातील गरजू मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या सामाजिक उद्देशाने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत गरजू मुलींना मोफत सायकलींचे वाटप, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिरवडे येथे मोफत लॅपटॉप प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल मिळाल्याने त्यांचा प्रवास सुलभ होण्याबरोबरच शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे. शाळेला लॅपटॉप मिळाल्याने विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिरवडे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी माजी सरपंच विठ्ठल वासुदेव गावडे, मुंबई कस्टम्सचे राजेश कदम, कस्टम्स अँड जीएसटी, नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कुडाळकर, मालवण शिवसेनेचे विधानसभा प्रमुख बबन शिंदे, ग्रामसेवक सुशांत चौघुले आणि नवी मुंबईतील विशाल बोरेकर यांचे विशेष सहकार्य व आर्थिक योगदान लाभले आहे.
उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा आणि गरजू मुलींना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या सामाजिक बांधिलकीबद्दल तिरवडे ग्रामस्थांच्या वतीने सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या प्रेरणादायी उपक्रमाला तिरवडे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे







