मालवण, प्रतिनिधी :
दशावतार कलाकारांची अधिकृत शासन दरबारी नोंदणी करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मालवण पंचायत समिती येथे उपस्थित राहून दशावतारी कलाकारांच्या नोंदणीला प्रारंभ केला. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
दशावतार कलाकारांच्या विविध मागण्या आणि त्यांना शासन स्तरावर न्याय मिळावा यासाठी आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कलाकारांच्या अनुदानात वाढ जाहीर केली. तसेच कलाकारांची अधिकृत नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.
त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईच्या सहाय्यक संचालक जयश्री घुगे, लेखाधिकारी गायत्री वेजारे आणि लिपिक सहदेव खैरे यांनी मालवण पंचायत समिती येथे येऊन नोंदणी प्रक्रिया राबविली. यावेळी गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समितीचे उपसभापती घनश्याम झाड तसेच पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटना, सिंधुदुर्ग-मालवण शाखेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, उपाध्यक्ष ओमप्रकाश चव्हाण, सचिव विनायक येरागी, सहसचिव विनोद परब, सल्लागार चंद्रकांत खोत, खजिनदार नितीन घाडीगावकर, सदस्य भास्कर मुसळे, श्रेयश खोत, दिनेश राऊळ, रुपेश चौकेकर, सुधीर तांडेल, सुहास माळकर, भाई मांजरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने दशावतार कलाकार उपस्थित होते.
या नोंदणी अभियानात दिवसभरात एकूण १०७ दशावतार कलाकारांची नोंदणी करण्यात आली. दरम्यान, मालवण तालुक्यातील ज्या कलाकारांची अद्याप नोंदणी झालेली नाही, त्यांनी पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटना, मालवण शाखेचे सचिव विनायक येरागी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.







