मालवण, प्रतिनिधी :
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत कुंभारमाठ हद्दीतील कातकरी वस्ती येथे पाच लाख रुपयांच्या निधीतून सोलार हायमास्ट टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधेमुळे वस्तीतील नागरिकांना रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षित आणि प्रकाशमान वातावरण उपलब्ध होणार आहे.
याबाबत ग्रामपंचायत कुंभारमाठच्या सरपंच सौ. पुनम मनोज वाटेगावकर यांनी आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.
सरपंच वाटेगावकर यांनी सांगितले की, आमदार निलेश राणे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांच्या मागण्यांची सातत्याने दखल घेत ग्रामीण आणि आदिवासी भागाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. कातकरी समाजाच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी निधी मंजूर झाला.
सोलार हायमास्ट टॉवरमुळे कातकरी वस्तीतील परिसर प्रकाशमान होण्यास मदत होणार असून, रात्रीच्या वेळी नागरिकांची सुरक्षितता वाढण्याबरोबरच दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होतील. या सुविधेमुळे वस्तीच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास सरपंच पुनम वाटेगावकर यांनी व्यक्त केला.







