मालवण | प्रतिनिधी
आचरा वरचीवाडी येथील एका बंगल्याच्या टेरेसवर सुरक्षेसाठी लावलेल्या नायलॉन जाळ्यात अडकलेल्या वानराच्या पिल्लाची प्राणीमित्रांनी वेळेवर सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडत जिवदान दिले.
आचरा वरचीवाडी येथील मारुती मंदिर रोड परिसरातील एका बंगल्याच्या टेरेसला लावलेल्या सुरक्षेच्या नायलॉन जाळ्यात सोमवारी सायंकाळी वानराचे पिल्लू अडकल्याचे शेजारील रहिवासी महेश मेस्त्री यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती सर्पमित्र तथा प्राणीमित्र स्वप्नील गोसावी यांना दूरध्वनीवरून दिली.
माहिती मिळताच स्वप्नील गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेत महेश मेस्त्री यांच्या मदतीने अत्यंत काळजीपूर्वक वानराच्या पिल्लाची जाळ्यातून सुखरूप सुटका केली. त्यानंतर कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करून या पिल्लाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले.
या बचाव मोहिमेत महेश मेस्त्री, दाजी गावकर, भाई गावकर आणि दिपा मेस्त्री यांनीही सहकार्य केले. प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे वानराच्या पिल्लाचे प्राण वाचल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.







