मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी दिन भंडारी हायस्कूलच्या पटांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर नगरसेवकपदी निवडून आलेल्या मंदार ओरसकर आणि ललित चव्हाण यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातून लोकप्रतिनिधी म्हणून मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमात कबड्डी खेळाच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील युवकांनी कबड्डीकडे अधिकाधिक वळावे आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर मालवणचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह नितीन हडकर, मालवण तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव रेनॉल्ड भुतेलो, रिद्धी हडकर, राजेश बांदकर, मिथिल हिंदळेकर, राखी हडकर, चंदन मांजरेकर यांच्यासह कबड्डीप्रेमी, खेळाडू आणि क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







