आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्याला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केले. मात्र इंद्रायणी नदीला आलेला महापूर आणि राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पडला.
आषाढी वारीसाठी लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आज भक्तिभावाने सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात पालखीने आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे तसेच राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती यांनी यंदाचा सोहळा अत्यंत मर्यादित स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षिततेला प्राधान्य देत संजीवन समाधी मंदिर परिसरात मानाच्या ५६ दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ १० वारकऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला.
परंपरा अबाधित ठेवत आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत पालखी प्रस्थानाचा धार्मिक विधी पार पडला. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नियोजित मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, पुढील काही दिवसांत लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.






