मालवण, दि प्रतिनिधी
ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी घेतलेल्या तीव्र आणि आक्रमक पवित्र्यामुळे अखेर मालवण नगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. देऊळवाडा, आडारी आणि आंगणेवाडी मुख्य रस्त्यावर पसरलेली डंपिंग ग्राउंडमधील घाण आज पालिका प्रशासनाने अग्निशमन बंबाच्या साहाय्याने पूर्णपणे धुवून स्वच्छ केली. प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
कालच शहरप्रमुख बाबी जोगी यांनी या परिसराची पाहणी करून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला होता. आंगणेवाडी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच डंपिंग ग्राउंडमधील घाण आणि कचरा पसरल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यामुळे पादचारी आणि वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराबाबत बाबी जोगी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले होते.
धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याची अशी दुरवस्था पालिका प्रशासन उघड्या डोळ्यांनी कशी पाहू शकते? जर हा रस्ता तातडीने साफ केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा बाबी जोगी यांनी दिला होता. या आक्रमक इशाऱ्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने आज सकाळीच युद्धपातळीवर काम सुरू केले. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह थेट अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. रस्त्यावर साचलेली सर्व घाण पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात आली.
बाबी जोगी यांनी वेळेत आवाज उठवल्यामुळेच प्रशासनाने ही तत्परता दाखवली, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या भागातील डंपिंग ग्राउंडच्या कचऱ्याचे कायमस्वरूपी नियोजन करावे, जेणेकरून भविष्यात मुख्य रस्त्यावर अशी घाण येणार नाही, अशी मागणीही आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.







