मालवण, चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके येथील एस.टी. प्रवासी शेड अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून या शेडच्या दुरुस्तीबाबत सातत्याने एस.टी. महामंडळाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
मार्च महिन्यात या शेडच्या दुरुस्तीसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आता पावसाळा सुरू झाला असून, परिसरात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या शेडखाली उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
याबाबत विचारणा केली असता, एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे तसेच टेंडर प्रक्रिया त्यांच्या अखत्यारित नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
धोकादायक अवस्थेतील ही प्रवासी शेड कोसळून एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल चौके ग्रामस्थांनी उपस्थित केला असून, तातडीने शेडची दुरुस्ती अथवा पर्यायी सुरक्षित व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.






