मालवण, दि प्रतिनिधी
बदलत्या वातावरणात शेती टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजना राबवून कृषी विभागाला भरपूर निधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी पळसंब येथे दिली.
पंचायत समिती मालवण, तालुका कृषी कार्यालय मालवण आणि पळसंब ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी दिन व शेतकरी मेळाव्या’चे आयोजन प्राथमिक शाळा पळसंब येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपसभापती घनशाम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी पी. आर. सावंत, जिल्हा परिषद सदस्या क्षमा हडकर, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, गणेश तोंडवळकर, योजना कांबळी, दीपक चव्हाण, मानसी भोगावकर, सीमा परुळेकर, पशुधन अधिकारी सुधीर कानसे, किर्लोस विज्ञान केंद्राचे विकास धामापूरकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, आणि विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक गटविकास अधिकारी परागिनी पाटील यांनी केले,
श्री. साटविलकर म्हणाले की, हवामान बदलाचे मोठे संकट शेतीसमोर आहे. या बदलत्या वातावरणाचा शेतीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून नवनवीन योजना राबविण्यास नेहमीच आग्रही असतात. याच धर्तीवर तालुक्यासाठी कृषी विभागाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी मालवणच्या सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी पुढील काळात मानवी आरोग्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या दारात किमान एकतरी गोमाता पाळावी, असे आवाहन केले.
पळसंब येथे शेतकऱ्यांसाठी १ हजार किलो हळद कंद उपलब्ध करून दिल्याबद्दल पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव यांनी पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे विशेष आभार मानले. या मेळाव्यात कृषी सेवक विवेक रंगे तर प्रगतशील शेतकरी प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी श्री. हांडे, ए. एम. परब, सुधीर गायकवाड, श्रीमती खोबरेकर, उपसरपंच अविराज परब, पोलीस पाटील पूनम गोलतकर यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सेवक, ‘आत्मा’चे कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







