मालवण (प्रतिनिधी) : ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजयाबाई मेहता यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण शाखेतर्फे शनिवार, दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता नगर वाचन मंदिर सभागृह, मालवण येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेला नवे कलात्मक आणि वैचारिक परिमाण देणाऱ्या विजयाबाई मेहता यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित या सभेत मालवणातील रंगकर्मी, नाट्यप्रेमी आणि कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण शाखेचे कार्यवाह संजय शिंदे यांनी केले आहे.





