मालवण दि प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार हाती घेतल्यानंतर अवघ्या बारा दिवसांत जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या आधुनिक लोकशाही मूल्यांचा स्पष्ट पुरस्कार करण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने ज्या मानवतावादी मूल्यांची हमी दिली, त्यांची बीजे शाहू महाराजांच्या राज्यकारभारात आणि त्यांच्या जाहीरनाम्यात आढळून येतात. रयतेला केंद्रस्थानी ठेवून शासनव्यवस्था उभारणारा आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणारा असा जाहीरनामा प्रसिद्ध करणारे राजर्षी शाहू महाराज हे भारतीय इतिहासातील अद्वितीय लोकराजे होते, असे प्रतिपादन कणकवली महाविद्यालय, कणकवली येथील इतिहास विभागप्रमुख, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व लेखक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले.
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, मालवण यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नागेश कदम होते. यावेळी व्यासपीठावर माजी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, मालवण नगरपालिकेचे नगरसेवक तथा मागासवर्गीय कल्याण समितीचे प्रमुख सिद्धार्थ जाधव, स. का. पाटील सिंधुदुर्ग मालवण महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, माजी तहसीलदार आनंद मालवणकर, प्रा. डॉ. दत्तात्रय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. कदम म्हणाले मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडाच्या संक्रमणकाळात भारतात सुमारे ५६५ संस्थाने अस्तित्वात होती. तथापि, त्यांपैकी आधुनिक लोकशाही मूल्यांवर आधारित आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारा राज्यकारभार करणारे महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थान हे एकमेवाद्वितीय ठरते, असे ते म्हणाले
यावेळी माजी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांनी राजर्षी शाहू महाराज हे केवळ राजे नव्हते, तर ते जनतेचे खरे सेवक होते. त्यांच्या कार्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. त्यांचे विचार आजही समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देतात असे सांगितले
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मीनाक्षी कांबळे यांनी केले. या व्याख्यानासाठी मालवण शहर व परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







