मालवण दि प्रतिनिधी
मालवण, तालुक्यात ख्रिस्ती बांधवांचा पारंपरिक आणि धार्मिक उत्साहाचा सण असलेला सान जॉव अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पावसाच्या सुरुवातीला येणाऱ्या या सणामुळे संपूर्ण मालवण परिसरातील ख्रिस्ती बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
काल बुधवारी सकाळपासूनच मालवण शहर तसेच वायरी, मेढा, चिंदर, देवबाग आणि मालवण परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी या सणाची जय्यत तयारी केली होती. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे पाना-फुलांपासून तयार करण्यात आलेले आकर्षक मुकुट, ज्याला स्थानिक भाषेत ‘कोपेल’ असे म्हटले जाते. अबालवृद्धांनी हे रंगीबेरंगी कोपेल डोक्यावर परिधान करून ‘सान जॉव’च्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
‘सान जॉव’ सणाचा मुख्य सोहळा म्हणजे विहिरींमध्ये किंवा जलाशयात उड्या मारणे. सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा होणाऱ्या या सणात येशू ख्रिस्ताच्या आगमनाने सेंट जॉन यांनी मातेच्या गर्भात मारलेल्या आनंदाच्या उडीचे प्रतीक म्हणून विहिरीत उड्या मारण्याची प्रथा आहे. मालवणातील विविध गावांमध्ये तरुणांनी एकत्र येत पारंपरिक गीतांच्या तालावर नाचत, गात गावातील विहिरींमध्ये आणि जलशयांमध्ये उड्या मारल्या. नवविवाहित जावयांना या सणासाठी खास आमंत्रित केले जाते आणि त्यांचे विशेष स्वागत केले जाते. या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घरोघरी बनवले जाणारे पारंपरिक पक्वान्न. तांदूळ, गूळ आणि खोबऱ्यापासून बनवलेले ‘सान्ना’आणि ‘पातोळ्यो’ यांसारख्या गोड पदार्थांचा आस्वाद यावेळी सर्वांनी घेतला. तसेच एकमेकांच्या घरी जाऊन फळे आणि मिठाईचे वाटप करून सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
हा सण निसर्गाशी जोडणारा आणि आनंद द्विगुणीत करणारा आहे. पावसाच्या आगमनासोबतच आमच्या संस्कृतीतील हा सण आम्हाला एकत्र आणतो आणि बंधुभाव वाढवतो. असे स्थानिक ख्रिस्ती बांधवांनी सांगितले.
पावसाची रिमझिम आणि डीजेच्या गजरात, ‘सान जॉव.. सान जॉव…’ चा गजर करत तालुक्यातील ख्रिस्ती बांधवांनी हा सण मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला. यामध्ये केवळ ख्रिस्ती बांधवच नव्हे, तर इतर समाजातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सणाचा आनंद घेतला. यामुळे मालवणच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन पुन्हा एकदा घडले.





