मालवण दि प्रतिनिधी
दहा दिवसापूर्वी चिंदर गावात झालेल्या विकास कामांबाबत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत भाजपचे सदस्य दीपक सुर्वे यांनी चिंदर गावच्या सोळा विकास कामांचा मुद्दा उपस्थित करीत वादळी चर्चा घडवून आणली भाजपचे सदस्य दीपक सुर्वे यांनी चिंदर गावात झालेल्या १६ विकासकामांची कोणी बिले मागण्यास आल्यास ती अदा करू नयेत असे सांगतानाच श्री सुर्वे यांनी चिंदर गावात यापूर्वी विविध विकासकामे आमदार, खासदार यांच्या माध्यमातून झाली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने तलावाचे कामही करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जर कोणीही येऊन विकासकामे करत असेल तर आणि त्याची बिले मागण्यास कोण येत असेल तर ती अदा करण्यात येऊ नये असे सांगितल्याने नजिकच्या काळात या विकास कामावरून वाद आणखी भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत
मालवण पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजी राजे सभागृहात सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपसभापती घनश्याम झाड, प्रभारी गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांच्यासह पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, मानसी भोगावकर, सीमा परुळेकर, योजना कांबळी, रिया बावकर, संतोष गावडे, दीपक सुर्वे आणि विविध खात्यांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
या सभेत तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या खालावलेल्या दर्जावर सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. डॉ. कुबेर मिठारी हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याने तालुक्यात एमबीबीएस डॉक्टरची कमतरता भासणार आहे. त्यामुळे येथे तातडीने नवीन एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करण्याचा ठराव घेण्यात आला. हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील इमारतीची अत्यंत भयानक दुरावस्था झाली असून, वैद्यकीय अधिकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या खोलीत राहत आहेत. तसेच रुग्णालयाला होणारा २ हजार लिटरचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने तेथे तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याचा ठराव करून तो पालकमंत्री, आमदार आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविण्यात यावा. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची दुरवस्था झाली असून ४ पैकी केवळ २ नवीन टायर देण्यात आले आहेत. यावर नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी सदस्य दीपक सुर्वे यांनी केली. सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
मालवण तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता एकूण २१ केंद्रप्रमुखांची आवश्यकता असताना तब्बल १६ पदे रिक्त आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या नियुक्तीत तालुक्याला केवळ ५ केंद्रप्रमुख देऊन मालवणवर अन्याय करण्यात आला आहे. तालुक्याला तातडीने आणखी ५ नवीन केंद्रप्रमुख मिळावेत, असा आग्रही ठरावही पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण यांनी आजच्या मासिक सभेत मांडला. हा ठराव जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच शिक्षण व आरोग्य सभापतींकडे पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
मालवण तालुक्यातील ७ वेदर स्टेशनपैकी चौके, कुंभारमाठ आणि हडी येथील वेदर स्टेशन बंद असल्याचा मुद्दा दीपक चव्हाण यांनी उचलून धरला. याच्या चुकीच्या अहवालामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले तर त्याला जबाबदार कोण? तुम्ही विमा कंपनीचे जावई आहात का?” असा संतप्त सवाल त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना केला. यावर कृषी अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत अहवाल विमा कंपनीला पाठवला नसल्याचे स्पष्ट केले. यावर वेदर स्टेशनचा अहवाल तपासून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तोंडवळी येथील वीजपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावरून सदस्य दीपक चव्हाण आणि गणेश तोंडवळकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लाखो रुपयांचे कर्ज काढून व्यवसाय सुरू करणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांना वीज मिळणार नसेल तर त्यांनी काय करायचे? असा सवाल करत वनविभागाकडे महावितरणने प्रस्ताव का सादर केला नाही, अशी विचारणा केली. सभापतींनी यावर ८ दिवसांत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तालुक्यात भूमिगत वीज वाहिन्या टाकल्यानंतर बाजूच्या साईडपट्ट्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, असा ठराव महावितरणच्या सिव्हिल डिपार्टमेंटला पाठविण्याचे ठरले.
वाढत्या उष्णतेमुळे उद्यापासून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळी ७ ते ११.१५ या वेळेत भरविण्याच्या सूचना केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिली. भगवंतगड येथील बंद शाळेचे साहित्य अन्यत्र हलविण्याची आणि दुरवस्था झालेल्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले.
हत्तीरोग निर्मूलनासाठी रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या रक्त तपासणी मोहिमेत जे नागरिक काही कारणास्तव सुटले आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा तपासणी मोहीम राबविण्याची मागणी सदस्या मानसी भोगावकर यांनी केली.
यावेळी सभापतींनी सर्व विभागप्रमुखांनी लोकप्रतिनिधीं सोबत समन्वय ठेवून
प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देश दिले. तर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सभेच्या शेवटी विविध विकासकामे, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधा यासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात आली.
सभेला कोणतीही पूर्वकल्पना न देता अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांबाबतही सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. पंचायत समितीच्या सभांना अधिकारी उपस्थित राहत नसल्याने लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करणे कठीण होत असल्याचे सदस्यांनी नमूद केले. याची गंभीर दखल घेत सभापतींनी विनाकारण गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.







