सिंधुदुर्गनगरी : गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शाळांना भेटी देण्याचा यशस्वी उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला होता. यावर्षी देखील सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला “शाळा प्रवेशोत्सव” हा उपक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनुसार राबविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी म्हणजे 15 जून रोजी लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी असे सर्व 309 शाळांना भेटी देणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे, समाज, पालक यांचा शिक्षणाचा दृष्टीकोन सकारात्मक करणे, बालकांनी आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे, तसेच सर्व विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी सदरचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भेट देणारे लोकप्रतिनिधी, अधिकाऱी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत दाखल होणाऱ्या विदयार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणारी मोफत पाठयपुस्तके, गणवेश वितरीत करणार आहेत. यावेळी शाळांमधील कामकाजाचा, शैक्षणिक गुणवत्तेचा व इतर सोयीसुविधांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विदयार्थ्यांच्या अध्ययनाचे मुल्यमापन होणार आहे. त्याच प्रमाणे लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी शाळाव्यवस्थापन समिती सदस्य व सरपंच यांचेशी चर्चा करुन ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल वाढविण्यासाठी उपायोजना सुचविणे हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे.
शाळेतील भौतिक सुविधेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा तसेच विद्यार्थ्याच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार या सारख्या विविध विषयाबात मार्गदर्शन करणे तसेच शाळेची धोकादायक बांधकामे, वापरा अभावी / पाण्याअभावी बंद असलेली शौचालये या सारख्या मूलभूत समस्या आढळून आल्यास संबधित यंत्रणेस ठोस सूचना कराव्यात या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद मधुकर कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तुकाराम चंद्रकांत साईल, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती प्रितेश शंकर राऊळ, जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष वसंत साटविलकर, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास समिती सभापती अनुराधा महेशकुमार नारकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती समिती रुहिता राजेश तांबे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुक्षम नियोजन केले आहे






