मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग अधिकारी, जलद बचाव पथक व ग्रामस्थांनी सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
दरम्यान, दि. ३ मे हा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन असून या पार्श्वभूमीवर बुधवळे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.
रविवारी बुधवळे मळेशेत येथील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ राजू मुणगेकर आणि संदिप बुधवळेकर यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वनविभाग अधिकारी, जलद बचाव पथक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून विहिरीतील बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सदरची बचाव मोहीम उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश शर्मा, साहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल श्री.संदीप कुंभार, मालवण वनपाल सदानंद परब, धामापूर वनरक्षक अतुल खोत,वाहन चालक राहुल मयेकर, RRT टीम सदस्य अनिल गावडे, दिवाकर बांबर्डेकर, सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे, संदिप परब स्थानिक ग्रामस्थ राजू मुणगेकर, अनंत शिर्सेकर, संदिप बुधवळेकर, समीर टेंबुलकर, प्रकाश बिडवलेकर, संदिप कुळेकर पोलीस पाटील व बुधवळे ग्रामस्थांच्या सहभागातून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.







