मालवण दि प्रतिनिधी
मध्यप्रदेश येथील जबलपूरमध्ये घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने होडीतून केवळ २० पर्यटक प्रवासी न्यावेत, असे आदेश दिल्याने होडी व्यावसायिक व बंदर अधिकारी यांच्यात वादावादी झाली. यामुळे होडी व्यवसायिकानी होडी सेवा काही काळ बंद ठेवली होती. होडी व्यावसायिक सर्व सुरक्षा नियमांचे पालन करीत सेवा देत असून सध्या महत्वाचा पर्यटन हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने तसेच पेट्रोल मिळत नसल्याने एका होडीतून २० पर्यटक नेणे परवडणारे नाही, अशी व्यथा यावेळी होडी व्यवसायिकानी मांडली. या वादात अनेक पर्यटकांना ताटकळत राहावे लागल्याने अखेर बंदर विभाग अधिकारी व होडी व्यावसायिक यांच्यात झालेल्या चर्चेतून एका होडीत ३० प्रवासी नेण्यात यावेत, असा सुवर्णमध्य काढण्यात आल्याने या वादावर पडदा पडला. त्यानंतर किल्ला होडी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली.
आज सकाळी मालवण बंदर विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक होडीतून केवळ २० पर्यटकांनाच नेण्याचे आदेश दिले होते. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे होडी व्यावसायिक आक्रमक होत त्यांनी या आदेशास नकार दिला. यामुळे बंदर अधिकारी आणि व्यावसायिक यांच्यात जोरदार शाब्दिच चकमक उडाली. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू असून पर्यटकांची गर्दीही मोठी आहे. त्यातच पेट्रोलचे दर आणि उपलब्धता पाहता, केवळ २० प्रवाशांना घेऊन प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, असे यावेळी होडी व्यवसायिकानी सांगितले. या वादामुळे संतप्त झालेल्या होडी व्यावसायिकांनी निषेध म्हणून आपली सेवा काही काळासाठी बंद ठेवली होती. भर उन्हात लांबून आलेल्या पर्यटकांना यामुळे ताटकळत उभे राहावे लागले.
आम्ही पर्यटकांची काळजी घेऊनच गेली अनेक वर्षे होडी सेवा देत आहोत. आम्ही पर्यटकांना लाईफ जॅकेट घालण्याची सक्ती करत आहोत. शासनाने घालून दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे आमच्याकडून काटेकोर पालन केले जात आहे. अशा परिस्थितीत प्रवासी संख्या अचानक कमी करणे अन्यायकारक आहे, अशी बाजू देखील होडी व्यवसायिकानी यावेळी मांडली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बंदर विभाग अधिकारी आणि होडी व्यावसायिक यांच्यात पुन्हा चर्चा झाली. या चर्चेअंती लवचिकता दाखवत एका होडीतून ३० प्रवासी नेण्यास बंदर विभागाकडून परवानगी दिली. या निर्णयामुळे होडी व्यावसायिकांचे समाधान होऊन वादावर पडदा पडला. या निर्णयानंतर किल्ला होडी वाहतूक सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. यामुळे खोळंबलेल्या पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर सुरक्षेचे नियम पाळून ३० प्रवाशांसह किल्ला होडी सेवा सुरु होती.







