मालवण दि प्रतिनिधी
जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची पराकाष्ठा हे गुण आत्मसात करून विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे ज्ञानसमृद्ध व्हावे असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कुडाळचे प्रा. श्री नितीन बांबर्डेकर यांनी आचरे येथे बोलताना केले.
आचरे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती श्री जे.एम. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर प्रा. श्री नितीन बांबर्डेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर जि. प . सदस्या वर्षा सांबारी , गटसाधन केंद्र मालवणचे विकास रुपनर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री ए. व्हि. घुटुकडे, उपमुख्याध्यापिका सौ. एम. एम. माणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक आणि स्वागत मुख्याध्यापक श्री ए.व्हि.घुटुकडे यांनी यांनी केले.
यावेळी प्रा. श्री नितीन बांबर्डेकर यांनी डॉ.आंबेडकरांचा भिवा ते बाबासाहेब हा जीवन प्रवास उलगडताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी तसेच त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व याबाबत ओघवते दर्शन घडविले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जे. एम. फर्नांडिस यांनी आपल्या भाषणात आंबेडकरांचे संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांना कसे प्रेरक आहे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा .श्री दत्तात्रय जाधव यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सौ.अनघा कदम यांनी केले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.







