मालवण (प्रतिनिधी)
चार महिन्यापूर्वी कट्टा गुरामवाड येथील रोहिणी रमेश गुराम या वृद्धेचा दिवसाढवळ्या खून होऊनही रोहिणी गुराम हिचे खुनी मोकाट फिरत असल्याने गावात आजही भीतीचे वातावरण आहे, मालवण पोलिसात गुन्हा दाखल होऊनही आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना अर्ज निवेदन देऊनही तपासात कोणतीच प्रगती न झाल्याच्या निषेधार्थ आज सकाळी गुरामवाडीच्या ग्रामस्थांनी कट्टा पोलीस दूरक्षेत्रासमोर उपोषण केले. ग्रामस्थांनी उपोषण सुरु करताच मालवण पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत उपोषणस्थळी भेट देत रोहिणी गुराम हिच्या खुन्यांना तातडीने पकडू अशी ग्वाही दिली. त्यामुळे गुरामवाड ग्रामस्थांनी पोलिसांच्या शब्दावर विश्वास ठेवत उपोषण स्थगित करत येत्या एक महिन्यात संबंधित खुन्यांना अटक न केल्यास १ मे या महाराष्ट्र दिनी बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला.
मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाड येथील रोहिणी रमेश गुराम या वृद्ध महिलेचां १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तीच्या राहत्या घरी अज्ञातानी खून करून पलायन केले होते. रोहिणी या सकाळी काराणेवाडी शाळेत मुलांना पोषण आहार देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यापूर्वी चोरीच्या उद्देशाने किंवा तिचा खून करण्याच्या उद्देशाने कोणीतरी घरात प्रवेश केला होता. पोषणआहार देऊन घरात प्रवेश केल्यानंतर रोहिणी गुराम हिचा अज्ञाताने खून करून पलायन केले होते. याबाबत मालवण पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. गेल्या चार महिन्यात या प्रकरणात मालवण पोलिसांकडून तपासात कोणत्याही प्रकारची प्रगती दिसून न आल्याने महिन्याभरापूर्वी गुरामवाड वासियांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. हे निवेदन सादर करताना २ एप्रिल रोजी कट्टा पोलीस दूरक्षेत्रासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला होता. हा इशारा देऊनही मालवण पोलीस गेल्या महिन्याभरात तपासात कोणत्याही प्रकारची प्रगती करू शकले नाहीत. त्यामुळे संतप्त बनलेल्या गुरामवाड वासियांनी आज सकाळी कट्टा पोलीस दूरक्षेत्राच्या आवारात उपोषणास सुरुवात केली. यावेळी मयत रोहिणी हिचा मुलगा मंदार रमेश गुराम, माजी सभापती बाळ महाभोज, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील गुराम, गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच धोंडी कामतेकर, ग्रा.पं. सदस्य सौ. सुप्रिया गुराम, सौ. श्रद्धा गुराम, यांच्यासह सुभाष गुराम, विठ्ठल गुराम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी उपोषण सुरु केल्याचे समजताच मालवणचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कट्टा येथे धाव घेतली. तर शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही कट्टा येथे जात पोलिसांशी चर्चा केली. यावेळी गुरामवाडी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या श्री. माने यांनी चर्चा करत तपासकामाची माहिती देत रोहिणी गुराम हिच्या खुन्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी येत्या महिन्याभरात रोहिणी गुराम हिच्या खुन्यांना न पकडल्यास महाराष्ट्र दिनी १ मे रोजी बेमुदत उपोषण करू, असा इशारा देत आजचे उपोषण स्थगित केले.







