Shri Ram Janmotsav and Hanuman Jayanti celebrations to be held at Gavandivada Ram Temple in Malvan with cultural programs and devotional events.
मालवण : प्रतिनिधी
मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा या उत्सवाचे १२७ वे वर्ष असून भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.
गुरुवार, २६ मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सकाळी ११ वाजता बाळ कासरलकर यांचे कीर्तन होणार असून दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाईल. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता माऊली वारकरी दिंडी, मोर्वे यांचा ‘विठुरायाची पंढरी’ हा कार्यक्रम रंगणार आहे.
त्यानंतर शनिवार, २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ, गवंडीवाडा यांच्यावतीने ‘बापाची कमाल पोराची धमाल’ (लेखक संदीप चिपकर) हे विनोदी नाट्यपुष्प सादर करण्यात येणार आहे.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवार, २ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्म सोहळा होणार आहे. याच दिवशी रात्री ९ वाजता ‘शिवशाहीचा शिरपेच’ (लेखक आबासाहेब आचरेकर, दिग्दर्शक महेश सावंत पटेल) हे ऐतिहासिक नाट्यपुष्प सादर होणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर गवंडीवाडा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.







