मालवण, प्रतिनिधी :
गुढीपाडव्याच्या सणाचे पारंपरिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप जपण्यासाठी मालवणातील “युथ बिट्स फॉर क्लायमेट” या संस्थेने चिवारीच्या रोपांचे वितरण करून अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत शहर व परिसरात एकूण ८५ चिवारीची रोपे वितरित करण्यात आली.
गुढी उभारण्यासाठी पारंपरिकरित्या वापरल्या जाणाऱ्या चिवारीच्या काठीला (बांबू) अलीकडच्या काळात कृत्रिम पर्याय उपलब्ध झाले असले तरी त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन पुन्हा नैसर्गिक साधनांकडे वळण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
चिवारी ही कोणत्याही प्रकारच्या जमिनीत सहज उभी राहणारी आणि टिकाऊ अशी वनस्पती असून, गुढीपाडव्याच्या सणात तिचे विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नववर्षाच्या प्रारंभी गुढी उभारताना चिवारीच्या काठीला मानाचे स्थान दिले जाते.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कृत्रिम वस्तूंमुळे वाढणारा कचरा आणि प्रदूषण रोखण्यासाठी “चिवारी लावा, परंपरा जपा” हा संदेश देत संस्थेने नागरिकांना रोपे लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी चिवारीची रोपे लावून ती जपण्याचा संकल्प केला असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मेगल डिसोजा यांनी सांगितले.







