On the occasion of Women’s Day, Rotary Club Malvan honored eight hardworking women from Katta, Guramwad, and Nandos who earn their livelihood through basket weaving, pottery, and making flower garlands.
मालवण (प्रतिनिधी)
महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवणतर्फे कट्टा, गुरामवाड आणि नांदोस परिसरातील कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. टोपल्या विणणे, मातीकाम करणे तसेच फुलांचे हार तयार करून उदरनिर्वाह करणाऱ्या आठ महिलांचा गौरव करण्यात आला.
कट्टा येथील बॅ.नाथ पै सेवांगण सभागृहात येथे हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी रुपाली परुळेकर, राजश्री कुडाळकर, स्मिता गोठणकर, संगीता माने, वत्सला माने, सुरेखा तांबट, मंगल माने आणि वैशाली माने या कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानित महिलांपैकी वैशाली माने आणि रुपाली परुळेकर यांनी रोटरी क्लबने त्यांच्या कामाची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच प्रथमच अशा प्रकारचा सन्मान मिळाल्यामुळे आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या सर्व महिला कष्टाच्या जोरावर आपल्या कुटुंबाचा प्रपंच सांभाळत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मिळालेले समाधान अवर्णनीय असल्याच्या भावना रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज पेडणेकर, सेक्रेटरी रंजन तांबे, डॉ. लीना लिमये, सुविधा तिनईकर, प्रवीणा शिंदे, रमाकांत वाक्कर, कार्यक्रमाचे नियोजन करणारे ऋषी पेणकर तसेच शिवानी गाड आदी उपस्थित होते.







