कोकणशक्ती सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅससाठ्यासंदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे समन्वयक, गॅस वितरक तसेच पेट्रोल पंप डिलर्स यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान BPCL, IOCL आणि HPCL या तीनही तेल कंपन्यांच्या समन्वयकांशी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू असल्याची माहिती दिली.
तसेच जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही, असेही तीनही कंपन्यांच्या समन्वयकांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी किंवा गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ८ मार्च २०२६ रोजीच्या पत्रान्वये जिल्हास्तरावर दक्षता/ फिरते पथक स्थापन करुन घरगुती गॅसची साठेबाजी तसेच कृत्रिम दरवाढ, अवैध वापर रोखणे इत्यादी आवश्यक त्या तपासण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी यावेळी दिले.
बैठकीत काही ग्रामस्थांकडून गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाड्या अडविण्याचे प्रकार घडत असल्याची बाब गॅस वितरकांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या आणि गॅस वितरक यांच्यात समन्वयाने काम करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.







