मुंबई – कोकणातील उद्योजिका सुरेखा वाळके यांना यंदाचा “आम्ही उद्योगिनी गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. दादर येथे शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी आयोजित राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
महिला उद्योजकतेस प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या “आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान”तर्फे दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातील विविध विभागांमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला उद्योजिकांचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जातो.
यावर्षी कोकण विभागातून सुरेखा वाळके यांची निवड करण्यात आली. उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या त्यांच्या उद्योजकीय प्रवासाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला.
पारितोषिक वितरण समारंभाला मॉरिशसच्या शिलाबाई बापू आणि ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुरेखा वाळके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल सुरेखा वाळके यांनी आनंद व्यक्त करत महिलांनी उद्योगक्षेत्रात पुढे येऊन स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.







