कोकणशक्ती – मुंबई प्रतिनिधी
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्त्रायल-अमेरिका तणावाचा परिणाम आता भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातही जाणवू लागला आहे. आधीच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली असून त्यातच आता गॅस सिलिंडर रिफिल करण्याच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.
प्रशासनाने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या रिफिलसंदर्भातील नियम अद्ययावत केले आहेत. यापूर्वी गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी १५ दिवसांचा वेटिंग टाईम होता. मात्र नव्या नियमानुसार हा कालावधी वाढवून २१ दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना २१ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तेल कंपन्यांनी या नव्या नियमांनुसार त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वेटिंग टाईम वाढवण्यात आला असला तरी बुकिंगची प्रक्रिया मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वर्षाला १५ सिलिंडरची मर्यादा
तेल कंपन्यांच्या नियमानुसार घरगुती गॅस कनेक्शनधारकांना वर्षभरात १२ सबसिडी असलेले सिलिंडर आणि ३ नॉन-सबसिडी सिलिंडर मिळतात. म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत एका कनेक्शनवर एकूण १५ सिलिंडर मिळू शकतात.
२४ तासांत डिलिव्हरीचा नियम कायम
दरम्यान, तेल कंपन्यांनी गॅस एजन्सींना ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर २४ तासांच्या आत सिलिंडरची डिलिव्हरी देणे बंधनकारक केले आहे. या नियमामुळे देशभरातील ग्राहकांची मोठी सोय झाली आहे.
२१ दिवसांनंतरच दुसरा सिलिंडर
नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना पहिला सिलिंडर मिळाल्यानंतर २१ दिवस पूर्ण झाल्यावरच दुसरा सिलिंडर बुक करता येणार आहे. कंपन्यांनी त्यानुसार सॉफ्टवेअरमध्ये दिवस लॉक केले आहेत.
मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, देशात गॅस सिलिंडरची कोणतीही कमतरता नाही. ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नसून आवश्यक तेवढे सिलिंडर उपलब्ध राहतील. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गॅस रिफिलिंग प्लांट रविवारीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.







