मालवण (प्रतिनिधी)
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहातील असुविधांबाबत ‘आमने सामने’ नाटकाच्या कलाकारांनी व्यक्त केलेली नाराजी योग्य असली, तरी सोशल मीडियावर रिल्सद्वारे नाट्यगृह व मालवण शहराची करण्यात आलेली बदनामी संतापजनक असल्याची भावना मालवणातील स्थानिक रंगकर्मी व नाट्यप्रेमींनी व्यक्त केली आहे. नाट्यगृहातील त्रुटी तातडीने दूर करून ते सुसज्ज करण्यात यावे, अशी मागणी कलाकारांनी नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मालवणमधील कलाकार व नाट्यप्रेमींनी मालवण नगरपालिकेत नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांची भेट घेऊन मामा वरेरकर नाट्यगृहातील विविध समस्यांवर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संजय शिंदे, सुनील परुळेकर, गौरव ओरसकर, सुजाता शेलटकर, महेश काळसेकर, प्रफुल्ल देसाई, शुभदा टिकम, रत्नाकर सामंत, सुधीर गोसावी, समृद्धी आसोलकर, पूजा सरकारे, श्रीराज बादेकर, भूषण मेतर, राहुल जाधव, मेगल डिसोजा आदी उपस्थित होते.
मामा वरेरकर नाट्यगृहात सादर झालेल्या ‘आमने सामने’ या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगानंतर संबंधित कलाकारांनी प्रेक्षकांसमोर नाट्यगृहातील सुविधांबाबत सार्वजनिक नाराजी व्यक्त केली होती. तसेच सोशल मीडियावर रिल्स प्रसारित करून नाट्यगृहाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप स्थानिक रंगकर्मींनी केला. या पार्श्वभूमीवर नगर वाचन मंदिर, मालवण येथे रंगकर्मींची बैठक घेण्यात आली असून या प्रकाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
नाट्यगृहातील समस्यांबाबत स्थानिक कलाकारांनी यापूर्वीही नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. नाट्यपरिषद मालवण शाखेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानंतर पावसाळ्यात गळणाऱ्या छपराची तसेच रंगमंच नूतनीकरणाची कामे हाती घेतल्याबद्दल नगरपालिकेचे आभारही कलाकारांनी मानले.
सध्या नाट्यगृहातील स्वच्छतागृहांची दुरवस्था, प्रेक्षागृहातील मोडकळीस आलेल्या खुर्च्या, अपुरी प्रकाशयोजना, बंद एसी व्यवस्था तसेच परिसरातील भंगार साहित्य याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. प्रेक्षागृहातील आसने नव्याने बसवावीत, नाट्यगृहासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावा, नूतनीकरणाच्या कामादरम्यान नाट्यगृह बंद ठेवू नये, देखभालीसाठी नगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी तसेच कामांवर देखरेखीसाठी स्थानिक अनुभवी रंगकर्म्यांची समिती स्थापन करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
मामा वरेरकर नाट्यगृह हे कोकणातील शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारलेले महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून ते मालवणची ओळख असल्याचे कलाकारांनी नमूद केले. नाट्यगृह कलाकारांसाठी मंदिरासमान असल्याने त्यातील त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत व यासाठी कलाकारांचे पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी नाट्यगृहाची पाहणी करून स्वच्छता, खुर्ची दुरुस्ती, एसी दुरुस्ती आदी कामांना प्राधान्याने सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले. उर्वरित समस्याही लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.






