मालवण | प्रतिनिधी
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवण यांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्याशाळा, मालवण येथे तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषेची गोडी वाढविणे आणि शुद्ध लेखनाची सवय लागावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही स्पर्धा १८ वर्षांवरील सर्वांसाठी खुली असून सहभागींसाठी लेखणी, कागद आणि स्पर्धेचा मजकूर आयोजकांकडून पुरविण्यात येणार आहे.
आकर्षक बक्षिसे
स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना चषक तसेच रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणीची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२६
नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२६ असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. नोंदणीसाठी लिमये हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा २५२२६६ / ७०५७९०६६८१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त होणारा हा उपक्रम भाषाप्रेमींसाठी एक उत्तम संधी ठरणार आहे.







