Senior fisherman Dada Sawaji from Sarjekot came straight from the ICU to cast his vote, inspiring many.
मालवण (प्रतिनिधी):
मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथील ज्येष्ठ मच्छीमार श्री. दादा सावजी यांनी आजारी असतानाही थेट हॉस्पिटलच्या आयसीयु मधून येऊन सर्जेकोट येथील मतदान केंद्रात हजेरी लावत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
हृदयविकाराच्या उपचारासाठी श्री. दादा सावजी हे मागील तीन दिवसांपासून मालवण येथील एका खाजगी रुग्णालयात आयसीयु मध्ये उपचार घेत होते. निवडणुकीच्या दिवशी त्यांनी मतदान करण्याची इच्छा आपल्या कुटुंबीयांकडे तसेच मच्छीमार नेते व मालवणचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर संबंधित डॉक्टरांची रीतसर परवानगी घेऊन सर्व खबरदारीसह त्यांना रुग्णालयातून सर्जेकोट येथील मतदान केंद्रावर आणण्यात आले.
मतदान केंद्रात पोहोचल्यानंतर त्यांनी शांतपणे मतदानाचा हक्क बजावला. गंभीर प्रकृती असूनही मतदानासाठी दाखवलेल्या धैर्याबद्दल मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्जेकोटच्या सरपंच सौ. परुळेकर, मतदान केंद्र अध्यक्ष सौ. डॉ. सुमेधा नाईक तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी आवश्यक ते सहकार्य केले.
यावेळी श्री. दादा सावजी यांनी सर्व मतदारांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले. तालुका निवडणूक अधिकारी श्रीमती शारदा पोवार यांनीही अशा जागरूक मतदारांमुळेच लोकशाही जिवंत आहे, असे मत व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० टक्के साक्षरता दर असून, अशा कर्तव्यदक्ष नागरिकांमुळे ती साक्षरता अधिक अर्थपूर्ण ठरते, असे त्यांनी नमूद केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ साक्षरता नाही तर सुसंस्कृत साक्षरता आहे, त्यामुळेच परिपूर्ण लोकशाही घडते, असे मत त्यांनी व्यक्त केले.








