सोनं आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांनी सध्या इतिहास रचला असून, अवघ्या काही दिवसांत सर्व जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. चांदीने थेट ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडत नवा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे, तर सोन्याचे दरही वेगाने वाढत असून ते सर्वसामान्य खरेदीदाराच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे. या अभूतपूर्व तेजीमुळे बाजारात “हे दर नेमके कुठे थांबणार?” अशी चर्चा सुरू आहे.
गेल्या अवघ्या २४ तासांत बाजाराचा संपूर्ण खेळ पालटला. एमसीएक्सवर चांदीचा दर प्रति किलो ४ लाख ७ हजार ४५६ रुपयांवर पोहोचला. दिल्लीच्या सराफा बाजारातही चांदीने सर्वकालीन उच्चांक नोंदवला आहे. विशेष म्हणजे, ४ लाखांचा ‘जादुई टप्पा’ गाठण्यासाठी चांदीला केवळ १५ हजार रुपयांची गरज होती आणि ती फक्त एका दिवसात पूर्ण झाली. मंगळवारीच चांदीच्या दरात ४० हजार ५०० रुपयांची मोठी उसळी आली होती, तर बुधवारी आणखी १५ हजार रुपयांची वाढ झाल्याने चांदीने इतिहास घडवला.
चांदीबरोबरच सोन्याचे दरही तितक्याच वेगाने गगनाला भिडले आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ७५ हजार ८६९ रुपयांवर पोहोचून नवा विक्रम प्रस्थापित झाला. बुधवारी ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात एका दिवसात तब्बल ५ हजार रुपयांची वाढ झाली असून, बाजार बंद होताना दर १ लाख ७१ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावले.
राज्यातील सराफ बाजारातही या दरवाढीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दरात १३ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल २२ हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. जळगावमध्ये जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ८२ हजार ३१० रुपये, तर चांदीचा दर ४ लाख १ हजार ७०० रुपयांवर पोहोचला आहे. जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच केवळ ३० दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात इतकी मोठी वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
या प्रचंड दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकन डॉलरची कमजोरी हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. डॉलर घसरल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल चलनांऐवजी सोने आणि चांदीकडे वळतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील भूमिकेमुळे डॉलर आणखी कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात असून, याचा थेट फायदा मौल्यवान धातूंना होत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, येत्या काळात सोनं २ लाख रुपयांचा टप्पा गाठू शकते, तर चांदीचे दर साडे चार लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी खरेदीदार संभ्रमात सापडले असताना, गुंतवणूकदार मात्र या तेजीचा फायदा घेताना दिसत आहेत.







